नवी दिल्ली- इंग्लंड आणि वेल्स येथे ३० मे पासून सुरू होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाकडून विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नेटमध्ये सरावा करताना वेगवान गोलंदाज अॅनरिच नॉर्टजे दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीतून सावरण्यासाठी अॅनरिचला साधारण ८ आठवड्यांचा वेळ लागणार असल्याने त्याला विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकाकडून दुखापतग्रस्त अॅनरिच नॉर्टजेच्या जागी अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला संघात स्थान देण्यात आले आहे. मॉरिसने दक्षिण आफ्रिकेसाठी आत्तापर्यंत ३४ वनडे सामने खेळताना ३९४ धावा केल्या असून ३५ विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत.