नवी दिल्ली -मर्यादित आणि झटपट क्रिकेटचा 'राजा' असलेला ख्रिस गेल आता नवीन स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. येत्या २९ फेब्रवारीपासून नेपाळची देशांतर्गत एव्हरेस्ट प्रीमियर लीग (ईपीएल) टी-२० स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत विंडीजचा स्फोटक फलंदाज गेल पोखरा रायनो संघाकडून खेळणार आहे.
हेही वाचा -दिग्गज ब्रायन लारा पुन्हा खेळणार क्रिकेट!
या स्पर्धेत गेलला टी-२० कारिकर्दीतील मोठा विक्रम नोंदवण्याची संधी आहे. पोखरा रायनोकडून खेळताना गेल टी-२० मधील १०००वा षटकार ठोकू शकतो. सध्या त्याच्या खात्यात ९७८ षटकार जमा आहेत. त्यामुळे त्याला हा जादुई आकडा गाठण्यासाठी २२ षटकारांची आवश्यकता आहे.
ईपीएलच्या आयोजकांनी गेलचे वादळ नेपाळमध्ये येत असल्याचे ट्विट केले असून खुद्द गेलनेही आपल्या समावेशाबद्दल ट्विट केले आहे. गेलने आतापर्यंत ४०४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये १३२९६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तब्बल २२ शतके आणि ८२ अर्धशतके ठोकली आहेत.