नवी दिल्ली -भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. विराट नॉन-स्ट्राईकला असल्यावर मी दबावमुक्त असतो. तो जेव्हा फलंदाजीला येतो, तेव्हा विरोधी संघाचे संपूर्ण लक्ष त्याच्यावर असते. विराटला लवकरात लवकर बाद करण्याबाबत त्यांचा विचार सुरू असतो, असे पुजाराने सांगितले.
पुजारा म्हणाला, "मला कोहलीबरोबर फलंदाजी करायला आवडते आणि त्याचे कारण म्हणजे तो एक सकारात्मक खेळाडू आहे. एकदा तो खेळपट्टीवर आला की गोलंदाज त्याला बाद करण्याचा प्रयत्न करतात. जर त्याला पहिला चेंडू आखूड टप्प्याचा मिळाला तर तो चौकार खेचतो. म्हणूनच गुणफलक हलता असतो. विरोधी संघ विराटला बाद करण्याच्या प्रयत्नात असल्याने माझ्यावर दबाव राहत नाही."
काही दिवसांपूर्वी, पुजाराने फलंदाजीचा सराव सुरू केला. या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. जेथे उभय संघ चार कसोटी सामने खेळतील.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उभय संघातील पहिला कसोटी सामन्याला ३ डिसेंबरपासून सुरुवात होईल. हा सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. त्यानंतर ११ डिसेंबरला अॅडलेड येथे दुसरा, २६ डिसेंबरला मेलबर्न येथे तिसरा आणि ३ जानेवारी २०२१ मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघ विदेशी खेळपट्टीवर आपला पहिला 'डे-नाईट' कसोटी सामना खेळणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) ३ ते ७ जानेवारी २०२१ ला हा सामना रंगणार आहे.