चेन्नई - भारताचा कसोटी स्पेशालिस्ट अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत ७३ धावांची खेळी केली. पुजाराचे हे कसोटीतील २९ वे अर्धशतक ठरले. आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर पुजाराने पंतसोबत पाचव्या गड्यासाठी ११९ धावांची भागिदारी केली. तो संघाला तारणार असे वाटत होते. परंतु विचित्र पद्धतीने त्याला माघारी जावे लागले.
इंग्लंड संघाने दिलेल्या ५७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची आघाडी अपयशी ठरली. भारताचे चार फलंदाज शंभरीच्या आत बाद झाले. तेव्हा अनुभवी पुजारा आणि ऋषभ पंत यांनी मोर्चा सांभाळला. या दरम्यान, पंतने आक्रमक फलंदाजीचा नजराणा पेश करत इंग्लंड गोलंदाजांची पिसे काढली. तर पुजाराने दुसरी बाजू पकडून ठेवली.
पुजाराला नशिबाची साथ लाभली नाही. तो विचित्र पद्धतीने बाद झाला. फिरकीपटू डॉम बेसच्या गोलंदाजीवर पुजाराने पूल शॉट मारला. तो चेंडू फॉरवर्डला उभ्या असलेल्या ओली पोपच्या पाठीला लागून हवेत उडाला. तेव्हा त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या रोरी बर्न्सने तो पकडला आणि पुजाराला परत जावे लागले.