बंगळुरू - भारत आणि बांगलादेश संघात कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाचा हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारताचा अव्वल फलंदाज चेतेश्वर पुजाराने दिवस-रात्र कसोटी सामन्यादरम्यान सूर्यास्ताच्यावेळी चेंडू दिसण्यास अडचण भासू शकते, असे मत व्यक्त केले आहे.
भारत-बांगलादेश संघातील आयोजित दिवस-रात्र कसोटी सामन्याला २२ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या सामन्यादरम्यान प्रथमच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा वापर होणार आहे. दोन्ही संघ प्रथमच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार असून गुलाबी चेंडू अधिकृतपणे खेळविला जाणार आहे.
या सामन्यापूर्वी पुजारा म्हणाला, 'मी दुलिप ट्रॉफी स्पर्धेत गुलाबी चेंडूने खेळलो आहे. माझा तो चांगला अनुभव होता. गुलाबी चेंडूवर दिवसा खेळताना कुठली अडचण भासणार नाही. पण सूर्यास्ताच्यावेळी व प्रकाशझोतामध्ये अडचण भासू शकते. म्हणून सूर्यास्ताच्या वेळचे सत्र अधिक महत्त्वाचे राहील.'