मुंबई -भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याच्या इंडियन ऑईल टीमच्या सहकाऱ्यांशी इन्स्टाग्रामवर संवाद साधत आपले अनुभव सांगितले आहेत. या संभाषणात रहाणेने इंग्लंडमधील फलंदाजीचा अनुभवही शेअर केला.
जर मी फक्त एका गोलंदाजाबद्दल बोललो तर इंग्लंडमध्ये अँडरसनविरूद्ध खेळणे खूप आव्हानात्मक आहे. त्याला परिस्थिती चांगली ठाऊक असते, असे रहाणे म्हणाला. कोरोनाच्या उद्रेकामुळे रहाणेसह अनेकजण आपल्या घरी कुटुंबीयासवेत वेळ घालवत आहेत.
रहाणे म्हणाला, "हा नक्कीच एक अवघड काळ आहे, परंतु त्यातील सकारात्मक बाबींकडे पाहता मला मुलगी आणि कुटुंबासमवेत वेळ घालवण्यास मिळत आहे. माझी मुलगी साडेसहा महिन्याची आहे. तिच्यासोबत असल्यामुळे मी नशीबवान आहे.''
रहाणेने घरात राहताना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याच्या गरजेवरही भर दिला. "या क्षणी मानसिकदृष्ट्या सकारात्मक असणे महत्वाचे आहे. मी माझ्या फलंदाजीची मानसिकदृष्ट्या कल्पना करतो. आंतरराष्ट्रीय खेळाडू, क्रिकेटर म्हणून तुम्हाला मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असले पाहिजे", असेही रहाणेने सांगितले.