कॅनबेरा - भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन देशांच्या टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. कॅनबेरा येथील मानुका ओव्हल मैदानावर हा सामना पार पडला. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ही तिरंगी मालिका खेळवण्यात येत आहे.
हेही वाचा -मेस्सीचा अजून एक पराक्रम!
इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने २० षटकांत ७ गडी गमावून १४७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने पाच गडी राखून हा सामना जिंकला.
इंग्लंडच्या संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. त्यांनी आपल्या पहिल्या दोन विकेट्स लवकर गमावल्या. कर्णधार हीटर नाईटने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. तिने ४४ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह ६७ धावा ठोकल्या. भारताकडून राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, दीप्ती शर्मा यांनी दोन आणि राधा यादवने एक गडी बाद केला.
इंग्लंडने दिलेल्या १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी पहिल्या विकेटसाठी २७ धावा जोडल्या. त्यानंतर, कर्णधार हरमनप्रीत कौरने भारताकडून सर्वाधिक ४२ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
इंग्लंड संघाकडून कॅथरीन ब्रंटने दोन बळी टिपले. सोफी इक्लेस्टोन, नताली स्केव्हर आणि हीथ नाइट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या तिरंगी मालिकेतील भारताचा पुढील सामना २ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.