मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेला उद्यापासून (ता.१२) सुरूवात होणार आहे. उभय संघात पाच सामन्याची मालिका खेळवण्यात येत आहे. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याला या मालिकेत एक विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चहलने एक गडी बाद केला तर तो भारतासाठी आंतराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरेल. सद्यघडीला हा विक्रम भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावे आहे. बुमराहचा हा विक्रम मोडण्याची चहलला नामी संधी आहे.
३० वर्षीय चहलने आतापर्यंत ४५ टी-२० सामने खेळी आहेत. यात त्याने २४.६८ च्या सरासरीने ५९ गडी बाद केले आहेत. तर दुसरीकडे बुमराहने ५० टी सामन्यात ५९ गडी बाद केले आहेत.