सिडनी - येत्या १८ ऑक्टोबरपासून आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये नियोजित आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्याची मागणी करण्याचे ठरवले आहे. आयसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत ऑस्ट्रेलिया बोर्ड हा मुद्दा उपस्थित करणार आहे.
नुकत्याच झालेल्या महिला टी-२० विश्वकरंकडकात उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नव्हता. यामुळे आयसीसीवर टीकेची झोड उठली. कारण, या स्पर्धेतील भारत-इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे एकही चेंडू न खेळता रद्द झाला. भारत गुणातालिकेत अव्वल असल्याने अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. सामना न खेळताच इंग्लंडच्या महिला संघाला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. तेव्हाच अनेकांनी आयसीसीवर टीका केली होती.
महिला विश्वकरंडकात झालेली प्रकार पाहता, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुरूष विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याची मागणी करण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा येत्या १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात होणार असून याचा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे.