मुंबई - भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे, जो क्रिकेटच्या टी-२० प्रकारात द्विशतक करू शकतो, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने व्यक्त केले आहे.
ब्रॅड हॉग ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत होता. तेव्हा एका चाहत्याने कोणता खेळाडू टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक करु शकतो, असे तुला वाटते?, असा सवाल केला. यावर हॉजने, रोहित शर्मा हा सद्यघडीला एकमेव खेळाडू आहे. जो टी-२० प्रकारात द्विशतक करु शकतो. त्याचा स्ट्राईक रेट, टाईमिंग आणि मैदानाच्या चोहोबाजूंनी चेंडू फटकावण्याची तिची मारण्याची क्षमता पाहता, तो द्विशतक करु शकतो, असे सांगितले.
दरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने केल्या आहेत. त्याने इंडियन प्रिमिअर लीगमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना १७५ धावा नाबाद झोडपल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने झिम्ब्बावेविरुद्ध १७२ धावांची खेळी साकारली होती.