मेलबर्न :भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील आज दुसरा सामना आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटेपासूनच हा सामना सुरू झाला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मालिकेतील पहिला सामना ८ गडी राखून जिंकल्याने, यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तर दुसरीकडे विराट कोहली आणि मोहम्मद शमी शिवाय भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियात भारताचा हा ५० वा कसोटी सामना आहे. मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी आणि मागील सामन्यातील अपमानजनक पराभवाचा सूड घेण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.
भारतीय संघात मोठे बदल..
विराट कोहली आणि मोहम्मद शामीसोबतच, दुसऱ्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ आणि वृद्धीमान साहाला आराम देण्यात आला आहे. तर शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचं कसोटी पदार्पण होणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य राहणेकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. दुसऱ्या कसोटीसाठी निवडण्यात आलेल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये अष्टपैलू रविंद्र जडेजाला देखील संधी देण्यात आली आहे. तो दुखापतीमधून सावरल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले. पहिल्या कसोटी सामन्यातील मानहानीकारक पराभवनंतर यावेळी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आर अश्विन आणि रविंद्र जडेजा फिरकीची धुरा सांभाळतील. तर बुमराह आणि उमेश यादव यांच्यासोबत युवा मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी म्हटल्यानुसार, ते जोपर्यंत गरज भासत नाही तोपर्यंत हाच संघ कायम ठेवणार आहेत.
चार कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं १-० ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ या मालिकेत पुनरागमन करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.