मुंबई -वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रेल्वे आणि मुंबई यांच्यातील रणजी करंडक सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवशी दोन्ही संघातील गोलंदाजांनी १५ गडी बाद करण्यात यश मिळवले. प्रथम फलंदाजी करणार्या मुंबईचा संघ ११४ धावांत गडगडला. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या रेल्वेचा संघही तग धरू शकला नाही. दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी ११६ धावांत पाच बळी गमावले आहेत.
हेही वाचा -पाकचा माजी खेळाडू म्हणतो, 'गांगुलीची ४ देशांच्या मालिकेची कल्पना बेकार'
केवळ चार फलंदाज मुंबईसाठी दुहेरी आकडा गाठू शकले. त्यापैकी कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ३९ धावा केल्या. जय बिश्ताने २१, सिद्धेश लाड १४ आणि पृथ्वी शॉने १२ धावा केल्या. टी. प्रदीपने रेल्वेकडून सर्वाधिक ६ गडी बाद केले. अमित मिश्राने तीन आणि हिमांशू सांगवानने एक गडी बाद केला.
त्यानंतर मैदानात आलेल्या रेल्वेच्या संघानेही सुरूवातीला हाराकिरी पत्करली. मात्र, अरिंदम घोष आणि कर्णधार कर्ण शर्मा यांनी संघाचा ताबा घेतला. संघाने ४३ धावांत पाच गडी गमावले. त्यानंतर या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ७३ धावा करून संघाला चांगल्या स्थितीत आणले. घोष ५२ आणि कर्ण २४ धावांवर खेळत आहेत.
घोषने आतापर्यंत ७५ चेंडूत ९ चौकार ठोकले आहेत. कर्णने ४६ चेंडूत ३ चौकार ठोकले आहेत. मुंबईकडून दीपक शेट्टीने तीन गडी बाद केले आहेत. तुषार देशपांडे आणि आकाश पारकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला आहे.