मुंबई - भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा आटोपून आज पहाटे मायदेशी पोहोचला आहे. संघातील खेळाडूंना क्वारंटाइन करणार नसल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले आहे. यामुळे खेळाडू विमानतळावरून थेट घरी पोहोचले आहेत.
आज पहाटे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ यांच्यासह काही खेळाडूंचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. तेव्हा उपस्थित नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यादरम्यान, मुंबई महापालिकेने या खेळाडूंना क्वारंटाइन करणार नसल्याचे स्पष्ट केले.
भारतीय खेळाडूंना क्वारंटाइन करणार नाही कोरोनाचा पार्श्वभूमिवर विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मुंबई दाखल झाल्यानंतर क्वारंटाइन करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. पण यातून भारतीय खेळाडूंना वगळण्यात आले आहे.
भारतीय खेळाडूंना क्वारंटाइनमधून का वगळले -
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये बायो बबलमध्ये राहत होते. याशिवाय त्यांची ऑस्ट्रेलियामधून निघतानाच आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. यात सर्व खेळाडूंसह स्टापमधील कर्मचाऱ्यांचा अहवाल हा निगेटिव्ह आला होता. यामुळे त्यांना भारताकडे प्रयाण करता आले. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर खेळाडूंनी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना दाखवला. यानंतर खेळाडूंना क्वारंटाइन नियमातून सूट देण्यात आली. सर्व खेळाडू आपापल्या घरी पोहोचले आहेत.
पिछाडीनंतर मालिकेत बाजी
पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत सिडनी येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळ करत भारतीय संघाने विजय मिळवला आणि मालिका २-१ ने जिंकली.
हेही वाचा -भारतीय खेळाडूंना क्वारंटाइन करणार नाही! महापालिकेने सांगितले कारण
हेही वाचा -EXCLUSIVE: मोहम्मद सिराजच्या मोठ्या भावाची 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत