अबुधाबी -अंतिम फेरी गाठणे ही एक कर्णधार म्हणून सर्वोत्तम भावना आहे, अशी प्रतिक्रिया दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने दिली आहे. अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या सामन्यात दिल्लीने हैदराबादची झुंज मोडत काढत अंतिम फेरीत आपले तिकीट पक्के केले आहे. या सामन्यानंतर अय्यर बोलत होता.
...काय म्हणाला अय्यर
अय्यर म्हणाला, अंतिम फेरी गाठणे ही एक कर्णधार म्हणून सर्वोत्तम भावना आहे. हा प्रवास खूप चढउताराचा होता. सरतेशेवटी आम्ही एक संघ म्हणून मैदानावर उतरलो आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. प्रत्येक खेळाडूने संघाच्या विजयासाठी मेहनत घेतली. ही मेहनत कामी आली याचा मला आनंद आहे.'
चांगला संघ मिळाला
कर्णधारपद भूषवताना मला प्रशिक्षक आणि संघ मालकाची चांगली साथ आणि समर्थन मिळाले. वास्तविक मी खूप भाग्यशाली आहे, कारण मला इतकी चांगला संघ मिळाला. कर्णधार म्हणून जबाबदारी होती. पण वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. यामुळे आम्ही हे करू शकलो, असेही अय्यरने सांगितले. दरम्यान, अंतिम फेरीत दिल्लीचा सामना बलाढ्य मुंबईशी होणार आहे.
उपांत्य फेरीचा असा रंगला सामना -
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा त्याने शिखर धवनसोबत मार्कस स्टॉयनिसला सलामीला पाठवले. शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी केलेल्या ८६ धावांच्या मजबूत सलामीनंतर व हेटमायरने शेवटच्या काही षटकात केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने हैदराबादपुढे विजयासाठी १९० धावांचे मजबूत लक्ष्य ठेवले. धवनने ५० चेंडूत ७८ धावांची खेळी करत दिल्लीच्या मोठी धावसंख्येची पायाभरणी केली. तर अखेरच्या षटकात हेटमायरने फटकेबाजी करत २२ चेंडूत ४२ धावांची खेळी केली.
दिल्लीच्या १९० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर २ धावांवर त्रिफळाचीत झाला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या प्रियम गर्ग (१७) आणि मनिष पांडे (२१) या दोघांना स्टॉयनीसने एका षटकात माघारी पाठवले. अनुभवी जेसन होल्डर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ११ धावांवर बाद झाला. युवा अब्दुल समदच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केलं. पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. त्याने ४५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार खेचत ६७ धावा केल्या. अखेरीस दिल्लीने हा सामना १७ धावांची जिंकला.
हेही वाचा -हैदराबादला नमवून दिल्लीची प्रथमच फायनलमध्ये धडक, आता गाठ मुंबईशी
हेही वाचा -Women's T20 Challenge : सुपरनोव्हाज आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात जेतेपदासाठी झुंज