जोहान्सबर्ग -आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने चाहत्याविरूद्ध अपशब्द वापरल्याबद्दल सामना शुल्काच्या १५ टक्के दंड ठोठावला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी बाद झाल्यानंतर स्टोक्सने चाहत्याविरूद्ध चुकीची भाषा वापरली होती.
हेही वाचा -मेरी कोमला पद्मविभूषण तर, सिंधूला पद्मभूषण
स्टोक्सने वापरलेले शब्द हे प्रसारकाद्वारे रेकॉर्ड केले गेले होते. त्यानंतर त्याचे हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. आचारसंहितेच्या कलम २- ३ चे उल्लंघन केल्याबद्दल आयसीसीने स्टोक्सला दोषी ठरवले असून त्याच्या खात्यात एक डिमेरिट गुण जोडला गेला आहे.
मैदानावरील पंच ब्रूस ऑक्सनफोर्ड आणि जोएल विल्सन यांनी स्टोक्सवर आरोप केले होते. स्टोक्सने हा दंड स्वीकारला असल्याने त्याच्याविरूद्ध औपचारिक कारवाई करण्याची गरज भासणार नसल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर स्टोक्सने सोशल मीडियावर माफी मागितली होती.