कटक -भारत आणि वेस्ट इंडिज संघामध्ये एकदिवसीय मालिकेचा अंतिम आणि निर्णायक सामना उद्या रविवारी बाराबती स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे आणि विंडीजचा वेगवान गोलंदाज जेसन होल्डर टेबल टेनिस खेळताना दिसून आले. या दोघांचा व्हिडिओ विंडीज क्रिकेटने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
हेही वाचा -भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी!
उभय संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे पार पडला. या सामन्यात विंडीजने आठ विकेट्सने विजय नोंदवत मालिकेत आघाडी घेतली. पण, त्यानंतरच्या विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन करत 107 धावांनी विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
केरॉन पोलार्डच्या नेतृत्वात वेस्ट इंडीज संघाला मालिका विजयाची संधी आहे. विंडीजला मागील १७ वर्षात एकदाही भारतात एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. यापूर्वी विंडीजने भारताविरुद्ध २००२-०३ मध्ये सात सामन्यांची मालिका ४-३ ने जिंकली होती.
दुसऱ्या सामन्यात विंडीजचा संघ भारतावर वरचढ ठरला तर भारतीय संघाच्या नावे खराब विक्रमाची नोंद होईल. १५ वर्षात भारतीय संघावर मायदेशातील सलग दोन एकदिवसीय मालिकेत पराभूत होण्याची नामुष्की ओढावेल. भारतीय संघाने मार्चमध्ये मायदेशात खेळताना ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-२ ने गमावली आहे.