विशाखापट्टणम - आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या डावाला खिंडार पाडणाऱ्या मोहम्मद शमीने रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकीपटूंचे कौतुक केले आहे. 'या दोन्ही फिरकीपटूंमुळे आमच्यासारखे वेगवान गोलंदाज आराम करू शकतात', असे शमीने म्हटले आहे.
हेही वाचा -खो-खो : मुलांमध्ये महाराष्ट्र विजेता तर, मुलींमध्ये उपविजेतेपद
कसोटीच्या पाचव्या दिवशी खेळपट्टीचा पुरेपूर वापर करत शमीने पाच बळी घेतले. तर, रवींद्र जडेजाला चार बळी मिळाले. या सामन्यानंतर शमीने आपली प्रतिक्रिया दिली. 'जर तुमच्याकडे अश्विन-जडेजा सारखे दोन अव्वल फिरकीपटू असतील तर, संघातील वेगवान गोलंदाज आराम करू शकतात. कर्णधार प्रत्येक गोलंदाजाचे मत घेतो आणि ठरलेल्या रणनितीनुसार तो प्रत्येक गोलंदाजाला स्पेल निवडण्यासाठी स्वातंत्र्य देतो. त्यामुळे पाच-सात षटकांचा स्पेल करणे आणि योग्य ठिकाणी थांबणे हे, गोलंदाजाला ठाऊक असते. कर्णधार आणि इतर खेळाडूंमध्ये ताळमेळ चांगला आहे', असे शमीने म्हटले आहे.
विशाखापट्टणमच्या के. राजशेखर रेड्डी मैदानावर रंगलेला आफ्रिकेविरुध्दचा सामना भारताने २०३ धावांनी जिंकला. त्यामुळे ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली. शिवाय, त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत, आपली विजयी घौडदौड कायम राखली आणि या स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान अधिक बळकट केले आहे.