मुंबई - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या 13 व्या हंगामाची सर्व शक्यता बीसीसीआय पडताळून पाहत आहे. अशातच, युएई आणि श्रीलंका या लीगच्या यजमान पदासाठी स्पर्धेत उतरले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयने यंदाची आयपीएल स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यासाठी पसंती दर्शवली आहे. मात्र, या काळात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत आयसीसीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
एका वृत्तसंस्थेला बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले, ''कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाला अखेर ही स्पर्धा युएई किंवा श्रीलंका येथे नेण्यास भाग पाडले जात आहे. आम्ही अद्याप जागेबाबत (यजमानपदाबद्दल) निर्णय घेतलेला नाही. परंतु यावर्षी इंडियन प्रीमियर लीग होण्याची शक्यता आहे. भारतातील परिस्थिती इतकी अनुकूल नाही की संघ एक-दोन ठिकाणी येऊन सुरक्षित वातावरणात खेळू शकतील. खेळाडूंसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी बंद दाराच्या आड खेळ खेळवला जाऊ शकतो.''