शारजाह - भारताचे माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी इंडियन प्रीमियर लीग 2020च्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि सीईओ हेमंग अमीन हे देखील होते. या तिघांनी शारजाह येथील आयकॉनिक स्टेडियमला भेट दिली. या भेटीचे फोटो गांगुलींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आयपीएल आयोजित ठिकाणांपैकी गांगुलींनी सर्वप्रथम शारजाह स्टेडियम येथील तयारीचा आढावा घेतला. यानंतर ते दुबई व अबूधाबी येथील तयारीचे ही मूल्यांकन करतील. बीसीसीआय अध्यक्ष 9 सप्टेंबर रोजी दुबईला दाखल झाले आहेत. त्यांनी शारजाहला जाण्यापूर्वी 6 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला.
आयपीएल 2020 दरम्यान शारजाह क्रिकेट स्टेडियमवर 12 सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 22 सप्टेंबर रोजी या मैदानावर पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने येतील. 4 ऑक्टोबर रोजी या स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होईल.