कोलकाता -भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याला अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्याला तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली.
सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली -
वूडलँड हॉस्पिटलचे डॉ. आफताब खान यांनी सांगितले, की सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. पुढचे २४ तास गांगुलीला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाईल. त्याच्या हृदयात दोन ब्लॉकेजेस होती ती काढण्यात आली आहेत. त्यामुळेच त्याला त्रास जाणवत होता.
रुग्णालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले मेडिकल बुलेटीन -
रुग्णालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार, गांगुलीला माईल्ड कार्डियक अरेस्ट आला होता व सध्या त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याच्या बाहेर आहे. डॉक्टर रुपाली बसु यांनी सांगितले की, ४८ वर्षीय सौरव गांगुलीला आज सकाळी घरच्या जिममध्ये ट्रेडमीलवर व्यायाम करताना छातीत दुखू लागले व त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्याला आयएचडी Ø ई इस्केमिक हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास आहे. जेव्हा त्याला रुग्णालयात दुपारी १ वाजता दाखल करण्यात आले त्यावेळी त्याच्या हृदयाचे ठोके ७० हुन कमी पडत होते. तर रक्तदाब 130/80 mm असा सामान्य होता. त्याची इको टेस्ट व एचसीजी काढण्यात आला असून त्यामध्ये थोडी कॉम्लिकेशन्स दिसत आहेत. त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
ममता बॅनर्जींचे ट्विट -
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे, की सौरव गांगुलीला माईल्ड कार्डियक अरेस्ट आल्याचे व त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे ऐकून वाईट वाटले. त्याला लवकर व पूर्ण बरे वाटू दे. माझ्या सदिच्छा त्याच्या व त्याच्या कुटूंबासोबत आहेत.