मुंबई- कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने सर्व महत्वाच्या स्पर्धेसह आयपीएलचा १३ हंगामही स्थगित केला आहे. जर आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठे नुकसान होणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय या वर्षाच्या अखेरीस आयपीएलचे आयोजन करता येईल का? याची चाचपणी करीत आहे. या संदर्भातील वृत्त आयएएनएसने दिले आहे.
आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएलचे आयोजन करण्याचा विचार करीत आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी आयएएनएसला सांगितले की, 'आयपीएलच्या आयोजनाबाबत ठामपणे सांगणे योग्य ठरणार नाही. कारण यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. पण बीसीसीआय २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएलचे आयोजन करता येईल का, याची चाचपणी करत आहे. यासाठी परिस्थितीमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. याशिवाय सरकारची परवानगी गरजेची आहे, असे सूत्रांनी सांगितले.