मुंबई- इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने खेळाडूच्या पगार कपातीचे संकेत दिले आहेत. यातच जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळही (बीसीसीआय) असाच निर्णय घेईल, अशी चर्चा सुरू होती. यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण बीसीसीआयने पगार कपातीचे संकट ओढावणार नसल्याचे म्हटलं आहे.
कोरोनामुळे जगभरात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना घरीच बसावे लागले आहेत. त्यात अनेक क्रीडा संघटनांनी खेळाडूंचे पगार कापण्याचा निर्णय घेतला आहे. पण बीसीसीआयने पगार कपातीचे संकट ओढावणार नसल्याचे सांगत गुरुवारी सर्व करारबद्ध खेळाडूंचा तीन महिन्यांचा थकित पगार दिला आणि खेळाडूंना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, हेही स्पष्ट केले.
याविषयी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की,'अन्य क्रिकेट बोर्ड पगार कपातीवर चर्चा करत आहेत. परंतु बीसीसीआय आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. तसेच ती देशातील सर्व खेळाडूंची योग्य ती काळजी घेण्यास सक्षम आहे. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कोणावरही पगार कपातीचे संकट ओढावणार नाही.'