कोलकाता -भारताच्या महान कर्णधारांमध्ये गणना होणाऱ्या सौरव गांगुलीने आज 20 जून 1996 रोडी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात गांगुलीने शतकी खेळी करुन पदार्पण साकारले. आजच्या खास दिवसाची गांगुलीने आठवण काढली आहे.
''आयुष्यातील सर्वोत्तम क्षण'', असे गांगुलीने ट्विटरवर पदार्पणाचे फोटो शेअर करत म्हटले. गांगुलीची पत्नी डोना यांनीही या खास दिवशी ट्विट केले आहे. "24 वर्षांपूर्वी सौरवने पदार्पण केले होते. अभिमान आहे", असे त्या म्हणाल्या.
पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात गांगुलीने 131 धावा केल्या होत्या. यासह, तो पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा 10 वा फलंदाज ठरला. गांगुलीने 1992 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याला केवळ तीन धावा करता आल्या आणि पुढील चार वर्षे तो संघाबाहेरच राहिला.
गांगुलीने भारतासाठी 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळले. तो भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. सध्या गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (कॅब) अध्यक्षही राहिला होता.