नवी दिल्ली -ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दौरा संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध रणशिंग फुंकणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध ४ कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी १८ सदस्यीय भारतीय संघात इशांत शर्माचे पुनरागमन झाले आहे.
चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या नव्या निवड समितीने आज मंगळवारी भारताच्या कसोटी संघाची घोषणा केली. दुखापतीमुळे इशांत ऑस्ट्रेलियाचा दौरा करू शकला नाही. आयपीएलमध्ये त्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतर तो बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत रिहॅबिलिटेशनमध्ये होता.
हेही वाचा - ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाच्या नावावर विक्रमच विक्रम!
इशांतशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन हेदेखील इंग्लंडबरोबरच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात परतले आहेत. हे दोन्ही क्रिकेटपटू ऑस्ट्रेलिया दौर्यावर दुखापतग्रस्त झाले होते. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौर्यावर असून २७ जानेवारीला तो चेन्नईला रवाना होईल.