मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने, पुरुष खेळाडू पाठोपाठ महिला खेळाडूंशी केलेल्या कराराची यादी जाहीर केली आहे. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी करण्यात आलेल्या महिला खेळाडूंच्या करारासाठी अ, ब आणि क अशी श्रेणीची वर्गवारी करण्यात आली आहे. बीसीसीआयने 'अ' गटात फक्त तीन खेळाडूंना स्थान दिले असून या खेळाडूंना वर्षाला ५० लाख रुपये मानधन मिळणार आहे.
बीसीसीआयच्या 'अ' श्रेणीमध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव यांचा समावेश आहे. तर 'ब' श्रेणीत ८ खेळाडूंचा समावेश असून मिताली राज, झूलन गोस्वामी, एकता बिष्ट, राधा यादव, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, जेमिमाह रोड्रिग्ज आणि तानिया भाटिया यांचा यात समावेश आहे. या श्रेणीतील खेळाडूंना वर्षाकाठी ३० लाख रुपये दिले जाणार आहेत.
क श्रेणीमध्ये वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत, अनुजा पाटील, मानसी जोशी, डी हेमलता, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकर, हरलीन देओल, प्रिया पूनिया आणि शेफाली वर्मा या ११ जणींचा समावेश आहे. यांना वर्षाकाठी प्रत्येकी १० लाख रुपये मिळणार आहेत.