नवी दिल्ली - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर क्रिकेटपासून लांब आहे. धोनीला परत मैदानात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण अद्याप धोनीने पुनरागमनाविषयी कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान, धोनी टीम इंडियाकडून नव्हे तर आशियाई इलेव्हन संघाकडून खेळताना पाहायला मिळू शकतो.
पुढील वर्षी १८ मार्च ते २१ मार्च २०२० दरम्यान, विश्व इलेव्हन आणि आशियाई इलेव्हन यांच्यात २ टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे धोनीसह ७ भारतीय खेळाडूंची मागणी केली आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मागणी केलेले खेळाडू -
महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दीक पांड्या, रोहीत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा.
बांगलादेशनं बीसीसीआयला एक प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये धोनीसह सात खेळाडूंच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. या विषयी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष निजामुद्दीन चौधरी यांनी सांगितलं की, 'बांगलादेशमध्ये आशिया इलेव्हन आणि विश्व इलेव्हन यांच्यात २ टी-२० सामने होणार आहेत. त्यासाठी बीसीसीआयने सात खेळाडूंना या सामन्यांसाठी परवानगी द्यावी.'
बीसीसीआयने जर या प्रस्तावाला मान्यता दिली तर, धोनी या दोन सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. दरम्यान, बांगलादेश बीसीसीआयबरोबरच इतर बोर्डकडेही खेळाडूंसाठी मागणीसाठी प्रस्ताव पाठवणार आहे.
हेही वाचा -खुशखबर!..'गुलाबी' कसोटीच्या चौथ्या आणि पाचव्या दिवसाच्या तिकिटांचे पैसे परत मिळणार
हेही वाचा -सय्यद मोदी बॅडमिंटन चॅम्पियनशीप : स्पर्धा सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच सायनाने घेतली माघार