सिडनी - बिग बॅश लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिडनी सिक्सर्सने मेलबर्न स्टार्सला धूळ चारत ९ व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. सिडनी सिक्सर्सने हा सामना १९ धावांनी जिंकला. दरम्यान, त्यांचे हे दुसरे बीबीएल विजेतेपद ठरले.
बीबीएलचा अंतिम सामना पावसामुळे १२-१२ षटकांचा खेळवण्यात आला. मेलबर्न स्टार्सचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा सिडनी सिक्सर्सने प्रथम फलंदाजी करताना १२ षटकात ५ बाद ११६ धावा केल्या. सिडनी सिक्सर्सकडून जोश फिलिपीने अर्धशतक झळकावले. त्याने २९ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली.
सिडनीच्या ११७ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या मेलबर्न स्टार्सचा संघ १२ षटकात ६ बाद ९७ धावा करु शकला. निक लर्किन याने २६ चेंडूत ३८ धावांची नाबाद खेळी केली. मात्र, तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.