मेलबर्न - ऑस्ट्रेलियामध्ये सद्या एकीकडे न्यूझीलंड आणि यजमान संघात बॉक्सिंग डे कसोटी रंगली आहे. तर दुसरीकडे बिग बॅश लीगची धूम पाहायला मिळत आहे. बिग बॅश लीगच्या एका सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला धुतले. पण स्टेनने त्या फलंदाजाला बाद करत प्रत्त्युत्तर दिले. याचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अॅडिलेड स्टाइकर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात सामना खेळवण्यात येत होता. मेलबर्न स्टार्सचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी दुसरं षटक टाकण्यासाठी डेल स्टेनवर जबाबदारी दिली. दिग्गज बॉलर डेल स्टेनने आपल्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने केली. पण त्यानंतर अॅडिलेड स्टाइकर्सचा सलामीवीर जॅक वेदराल्डने डेल स्टेनच्या गोलंदाजीवर जोरदार धुलाई करण्यास सुरुवात केली.
जॅकने स्टेनच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा षटकार लगावत १२ धावा केल्या. यानंतर त्याने पुढील दोन चेंडूवर सलग दोन चौकार लगावले. डेल स्टेनने पहिला बॉल डॉट टाकल्यानंतर इतर चार चेंडूवर २० धावा निघाल्या. तेव्हा स्टेनही चांगलाच निराश झाला. मात्र, स्टेनने षटकातील शेवटचा चेंडूवर कमाल केला. त्याने शेवटच्या चेंडूवर जॅक वेदराल्डला मॅक्सवेलकडे झेल देण्यास भाग पाडले.