मुंबई - आजपासून सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेला सुरूवात होणार आहे. हंगामाला सुरूवात होण्याआधीच बडोद्याचा संघ वादात अडकला आहे. बडोद्याच्या आघाडीच्या खेळाडूंपैकी एक असलेल्या दीपक हुडाने अखेरच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेतली आहे. बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पांड्या याच्याशी झालेल्या वादानंतर उपकर्णधार हुडाने हा निर्णय घेतला.
बडोदाच्या रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना कृणाल आणि दीपक यांच्यात भांडण झाले. दीपकने बीसीसीआयला एक ईमेल करत स्पर्धतून माघार घेतल्याचे कळवले आहे. यात त्याने, कृणाल पांड्याने शिवीगाळ केल्याचा आरोप देखील केला आहे. शिवीगाळ केल्यामुळेच मी स्पर्धेत खेळणार नाही, असे हुडाने सांगितले आहे.
कृणालने वादादरम्यान दीपकला धमकी दिली असल्याचे वृत्त समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपक प्रशिक्षकाच्या परवानगीनेच सराव करीत असताना अष्टपैलू पांड्याने त्याला धमकावण्यास सुरूवात केली असल्याचे दीपकने आपल्या ई-मेलमध्ये लिहिले आहे.