लंडन -आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा ६२ धावांनी पराभव केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानला २६३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ २०० धावांवर बाद झाला. या विजयामुळे बांगलादेशने गुणतालिकेत ७ सामन्यांत ७ गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. बांगलादेशचा पुढील सामना बलाढ्य भारताविरुद्ध होणार आहे. त्यापूर्वी बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने एक मोठे वक्तव्य केले आहे.
बांगलादेशचा संघ भारताला पराभूत करण्याची क्षमता ठेवतो - शाकिब अल हसन - india
आमचा संघ सध्या चांगली कामगिरी करत असून, कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे शाकिब अल हसनने म्हटले आहे.
शकीब भारताविरुद्धच्या सामन्याबद्द्ल बोतलाणा म्हणाला की, 'भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करत एकही पराभव स्वीकारलेला नाही. ते या विश्वकरंडक स्पर्धेच्या विजेतेपदाचे मुख्य दावेदार आहेत. मात्र आमचा संघही सध्या चांगली कामगिरी करत असून, कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यामुळे भारताला पराभूत करण्याची क्षमता आमच्या संघात असून ते आम्ही करु शकतो.'
अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात शाकिबने दमदार गोलंदाजी केली होती. त्याने गुलबदिन नैब, रहमत शाह, अफगाण, मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह या ५ अफगाणि फलंदाजांना माघारी धाडत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. तसेच फलंदाजी करतामा शाकिबने अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्या या अष्टपैलू खेळीसाठी त्याला सामनावीर घोषित करण्यात आले होते .