नवी दिल्ली - भारत-बांगलादेश संघातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेचा पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मात्र, दिल्लीतील प्रदूषणाची पातळी पाहता हा सामना खेळवण्यात येऊ नये, अशी मागणी होत होती. मात्र, बीसीसीआयने सामना होणारच असा पावित्रा घेतला. बांगलादेशचा संघ भारतात पोहोचला असून त्यांच्या खेळाडूंवर मास्क लावून सराव करण्याची वेळ आली आहे.
दिवाळीमुळे दिल्लीत वाढलेले प्रदूषण या कारणाने, भारत-बांगलादेश सामना दुसरीकडे हलवण्यात यावा. अशी मागणी, पर्यावरण तज्ञांनी मंगळवारी केली होती. या संदर्भात तज्ञांनी बीसीसीआयला पत्रही दिले होते. यामुळे हा सामना होणार की नाही, याबाबत शंका होती.
बीसीसीआयने यावर दिल्लीतील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाशी चर्चा केली. तेव्हा मंडळाने वातावरण चांगले राहिल असे सांगितल्याने सामना होणार असे बीसीसीआयने जाहीर केले. पण आता दिल्लीच्या वातावरणाबाबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना आता संकटात सापडला असल्याचे म्हटले जात होते.