पॉटशेफस्ट्रूम- बांगलादेशने १९ वर्षांखालील आयसीसी विश्व करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच त्यांनी आपल्या पहिल्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. कर्णधार अकबर अलीच्या नाबाद 43 आणि सलामीवीर परवेज हुसैनच्या 47 धावांच्या बळावर बांगलादेश संघाने विजय साध्य केला. पावसामुळे बांगलादेशचा डाव 46 षटकांचा केला गेला होता. अंतिम सामन्यातील पराभवामुळे पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वकरंड जिंकण्याचे भारताचे स्वप्न अपुर्ण राहिले.
भारताकडून रवि बिश्नोईने 4 बळी टिपले. सुशांत मिश्रा (2) आणि यशस्वी जैस्वाल(1) त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुमार गोलंदाजी करुन 33अतिरिक्त धावा देणे भारतीय गोलंदाजांना महागात पडले.
त्यापूर्वी, १९ वर्षांखालील आयसीसी विश्व करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारतीय युवा संघाला १७७ धावांमध्ये गुंडाळले होते. अविशेक दास, शोरिफुल इस्लाम यांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारली. भारताकडून यशस्वी जैस्वालने एकाकी झुंज देत ८८ धावांची खेळी केली. त्याला तिलक वर्माने ३८ धावा करत चांगली साथ दिली.
नाणेफेक जिंकत बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर दिव्यांश सक्सेनाला बाद करत बांगलादेशी गोलंदाजांनी अलीचा निर्णय सार्थ ठरवला. दिव्यांश अवघ्या दोन धावांवर बाद झाला. त्याला अविषेक दासने महमूदूल हसनकरवी झेलबाद केले. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी ९४ धावांची भागिदारी करत भारताला शंभरी गाठून दिली. यादरम्यान जैस्वालने आपले अर्धशतक पूर्ण केले.
शाकीबने तिलक वर्माला माघारी धाडत जमलेली जोडी फोडली. तिलक वर्मा बाद झाल्यानंतर भारतीय डावाला गळती लागली. तेव्हा ध्रुव जुरेलने मधल्या फळीत यशस्वीला साथ देण्याचा प्रयत्न केला. यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर भारताचा डाव सावरला नाही. यशस्वी बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद १५६ होती. त्यानंतर २१ धावात भारताने ६ विकेट गमावल्या. अखेर भारताने षटकात सर्व बाद १७७ धावा केल्या.
बांगलादेशकडून अविषेक दासने सर्वाधिक ३ विकेट घेतले. त्याला हसन शाकीब आणि शोरिफुल इस्लामने प्रत्येकी २-२ गडी बाद करत चांगली साथ दिली. रकीब उल-हसनने एक बळी टिपला. अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने एक बदल केला. तर भारतीय संघाने उपांत्य फेरीचा संघ कायम ठेवला. बांगलादेशने हसन मुरादच्या ठिकाणी अविषेक दासला अंतिम ११ मध्ये संधी दिली. त्याने ३ गडी बाद करत आपला निवड योग्य असल्याचे दाखवून दिले.