ढाका - लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीसीने बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसनला २ वर्ष बंदीची शिक्षा सुनावली आहे. शाकिबच्या या शिक्षेवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शाकिब चुकला असून त्याला आपल्या चुकीची जाणीव आहे, असे शेख हसिना यांनी सांगितले.
बांगलादेशच्या स्थानिक वृत्तवाहिनीला बोलताना शेख हसिना यांनी म्हटले की, 'शाकीब चुकीचे वागला असून त्याने ते मान्यही केले आहे. त्याला शिक्षा भोगावी लागेल. पण याप्रकरणी सरकार म्हणून आम्ही लक्ष घालू शकत नाही. मात्र बीसीबी शाकिबच्या पाठीशी उभे राहिल.'
आम्हाला आशा आहे, की शाकिब बंदीनंतर पुन्हा मैदानात सुज्ञ क्रिकेटर म्हणून पुनरागन करेल आणि देशासाठी खेळेल. भ्रष्टाचार प्रकरणात आयसीसीने केलेली कारवाई योग्य आहे. बीसीबी आयसीसीच्या निर्णयाचे सन्मान करते, असेही हसीना यांनी म्हटलं.