नवी दिल्ली -भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या मालिकेवर संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत. पगार वाढवण्याच्या उद्देशाने बांगलादेश क्रिकेट संघाने कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भाग घेण्यास नकार दिला आहे. संघातील सर्व खेळाडू संपावर गेले असून बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे पगारात वाढ करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
हेही वाचा -आयपीएलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, आगामी हंगामात होणार 'हा' बदल
एका वृत्त वाहिनीच्या अहवालानुसार, या संपाची घोषणा संघातील अव्वल खेळाडूंनी केली. यात कसोटी आणि टी-२० संघाचा कर्णधार शाकिब अल हसन, यष्टीरक्षक मुशफिकुर रहीम आणि महमूदुल्लाह अशा मोठ्या नावांचा समावेश आहे.
बांग्लादेशच्या खेळाडूंनी सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी मंडळाविरोधात आपल्या मागण्या मांडल्या. या सर्वांनी मागणी पूर्ण होईपर्यंत राष्ट्रीय क्रिकेटवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशच्या पंधरा सदस्यीय खेळाडूंची निवड करण्यात आली. यावेळी संघाचे कर्णधारपद अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनकडे सोपवण्यात आले आहे. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
टी-२० मालिकेसाठी बांगलादेशचा संघ -
शाकिब अल हसन (कर्णधार), तमीम इकबाल, लिटन दास, सौम्य सरकार, नईम शेख, मुशफिकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ हुसैन, मोसादिक हुसैन, अमिनुल इस्लाम, अराफात सनी, मोहम्मद सैफउद्दीन, अल अमीन हुसैन, मुस्तफिजुर रहमान, सफीउल इस्लाम.