नवी दिल्ली - बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसनवर आयसीसीने भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन वर्षाची बंदी घातली होती. त्याचे निलंबन 29 ऑक्टोबर 2020 रोजी संपणार आहे. या शिक्षेबाबत शाकिबने प्रतिक्रिया दिली.
शाकिब म्हणाला, ''मी बुकींचे संपर्क खूप हलक्यात घेतले होते. जेव्हा मी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांना भेटलो. तेव्हा मी त्यांना सांगितले. त्यांना सर्व काही माहित होते. मी त्यांना सर्व पुरावे दिले. खरे सांगायचे तर मला फक्त एकाच वर्षासाठी बंदी घातली गेली. नाहीतर पाच किंवा दहा वर्षांसाठी माझ्यावर बंदी घातली जाऊ शकली असती.''
तो पुढे म्हणाला, ''परंतु मला वाटते की मी एक मोठी चूक केली आहे. कारण माझा अनुभव, मी खेळलेले आंतरराष्ट्रीय सामने आणि आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी आचारसंहितेचे घेतलेले प्रशिक्षण लक्षात घेता मला (सट्टेबाजांच्या संपर्काबद्दल अधिकाऱ्यांना माहिती न देण्याचा) हा निर्णय नाही घ्यायला पाहिजे होता. मला याची खंत आहे. कोणीही अशा संदेशांकडे किंवा फोनकडे दुर्लक्ष करू नये.''
शाकिब अल हसनला बुकींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शाकिबने ही बाब आयसीसीला कळवली नाही. यामुळे आयसीसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी शाकिबवर ही बंदी घालण्यात आली आहे.
2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेत शाकिब उत्तम फॉर्मात होता. त्याने आठ डावांमध्ये 606 धावा केल्या आणि 11 बळीही घेतले. या स्पर्धेत त्याने दोन शतके आणि पाच अर्धशतके झळकावली होती.