चट्टोग्राम - आपला पहिला कसोटी सामना खेळणारा कायले मेयर्स याने नाबाद द्विशतक ठोकत वेस्ट इंडीजला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. बांग्लादेशने दिलेल्या ३९५ धावांचा यशस्वी पाठलाग करताना विडींजने हा सामना ३ गडी राखून जिंकला आणि दोन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
बांगलादेशच्या पहिल्या डावातील ४३० धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५९ धावांवर आटोपला. त्यानंतर बांग्लादेशने दुसरा डावात ८ बाद २२३ धावांवर डाव घोषित करत विंडीजसमोर ३९५ धावांचे लक्ष ठेवले होते.
बांग्लादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचे तीन फलंदाज ५९ धावांवर माघारी परतले. तेव्हा विंडीजच्या संघावर पराभवाचे सावट होते. तेव्हा कायले मेयर्स व एनक्रुमाह बोन्नेर या जोडीने कमाल केली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी २१६ धावांची भागिदारी रचली. या भागिदारीने वेस्ट इंडीजवर असलेले पराभवाचे ढग दूर तर झालेच, आणि विंडीजने विजयाकडे वाटचाल सुरू केली.
एनक्रुमाह बोन्नेरने ८६ धावांवर बाद झाला. तेव्हा कायले मेयर्सने तळातील फलंदाजांना घेऊन विडींजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कायले मेयर्सने ३१० चेंडूत २० चौकार आणि ७ षटकारांसह २१० धावांची नाबाद खेळी केली.