मेलबर्न -क्रिकेटच्या मैदानावर अनेक रंजक किस्से घडत असतात. सामन्याव्यतिरिक्त अशा विविध घटनांमुळे चाहत्यांनाही निखळ आनंद मिळतो. दोन्ही संघाचे खेळाडू एकाच घटनेवर हास्य करत असतील तर ते पाहून आपल्या चेहऱ्यावरही हास्य उमलते. अशीच एक घटना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान घडली. जिथे गोलंदाजाने फेकलेला चेंडू गायब झाला आणि फलंदाजही तो शोधत राहिला.
हेही वाचा -'नाईटहुड' या उपाधीने ओळखला जाणार विश्वविजेत्या संघांचा कर्णधार
न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत असताना ही घटना घडली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ट्रेंट बोल्टला गोलंदाजी करत होता. स्टार्कच्या गोलंदाजीवर बोल्टला फटका खेळता आला नाही आणि चेंडू थेट त्याच्या पॅडच्या आत घुसला. हा चेंडू कुठे गायब झाला ते कोणालाच कळले नाही. मैदानातही शोधाशोध सुरू झाली. अखेर बोल्टला जेव्हा कळले तेव्हा त्याने चेंडू काढून दिला. या प्रसंगानंतर मैदानात एकच हशा पिकला.
बोल्टसोबत फलंदाजी करणारा नील वॅगनरलाही आपले हसू आवरले नाही. तेव्हा प्रतिस्पर्धी संघाचा नॅथन लायनही हसला. या सामन्यात बोल्टने ८ धावा केल्या. त्याला स्टार्कनेच बाद केले. पॅट कमिन्सच्या शानदार गोलंदाजीमुळे न्यूझीलंडचा पहिला डाव १४८ धावांवर आटोपला.