पुणे -नागोठणे येथे झारखंडविरूद्ध सुरू झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या दिवसअखेर ८९ षटकांत ५ बाद २२७ अशी मजल मारली आहे. अझीम काझी आणि विशांत मोरे यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राला हा पल्ला गाठता आला.
हेही वाचा -रणजी ट्रॉफी : पहिल्या दिवशी मुंबईच्या ६ बाद २८४ धावा
नाणेफेक जिंकून महाराष्ट्राने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या पाच षटकात महाराष्ट्राचे जय पांडे आणि नौशाद शेख हे दोन फलंदाज तंबूत परतले. त्यानंतर, आलेला अंकित बावणे आणि सलामीवीर स्वप्नील गुगळेने धावफलक हलता ठेवला. त्यानंतर ठराविक धावसंख्येच्या अतंरावर स्वप्निल गुगळे (२५), यश क्षीरसागर (११), अंकित बावणे (३७) धावांवर बाद झाल्याने महाराष्ट्राची ५ बाद ८८ अशी अवस्था झाली. त्यानंतर अझीम काझी आणि विशांत मोरे यांनी अर्धशतके झळकावत महाराष्ट्राचा डाव सावरत संघाची धावसंख्या दोनशे पार नेली. दुखापतीमुळे ६७ धावांवर विशांत मोरे रिटायर्ड हर्ट झाला. खेळ थांबला तेव्हा अझीम काझी सात चौकार आणि दोन षटकारांसह ७० तर, सत्यदेव बच्छाव ५ धावावर खेळत होते.
झारखंडकडून गोलंदाजीत राहुल शुक्ला आणि उत्कर्ष सिंगने प्रत्येकी २ तर अजय यादवने १ गडी बाद केला.