नवी दिल्ली -आयसीसी १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर झालेल्या भारत-बांगलादेश विवादावर माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदींनी प्रतिक्रिया दिली होती. भारतीय खेळाडूंचे वागणे चुकीचे असल्याचे बेंदीनी म्हटले आहे. आता भारतीय क्रिकेट संघाच्या दोन माजी कर्णधारांनी या विषयावर आपले मत दिले आहे.
हेही वाचा -क्रिकेट खेळण्यासाठी संगकारा पाकिस्तानात जाणार, संघाचं करणार नेतृत्व
कपिल देव आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारताच्या या खेळाडूंवर कारवाई करण्यात यावी, असे म्हटले आहे. रविवारी सेनवेस पार्क येथे झालेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशने डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला तीन गड्यांनी पराभूत केले. यानंतर दोन्ही संघांमध्ये बाचाबाची झाली होती.
'बीसीसीआयने या खेळाडूंविरोधात कठोर पावले उचलावीत, असे मला वाटते. क्रिकेटचा अर्थ विरोधी संघाला शिवीगाळ करणे असा होत नाही. मी आक्रमकतेचे स्वागत करतो, यात काहीही चूकीचे नाही, परंतु त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. स्पर्धात्मक होण्यासाठी आपण हद्द ओलांडू शकत नाही', असे कपिल देव यांनी एका वृत्तपत्राद्वारे म्हटले आहे.
कपिल देव यांच्या मुद्यावर अझरनेही सहमती दर्शवली आहे. 'मला या खेळाडूंविरोधात कारवाई करावीशी वाटते. मात्र, या तरूणांना शिकवण्यात यांच्या प्रशिक्षकांनी आधी कोणत्या भूमिका साकारल्या होत्या ते आधी पाहिले पाहिजे. उशीर होण्यापूर्वीच पावले उचलणे आवश्यक आहे. या खेळाडूंना शिस्तीत रहावे लागेल', असे अझरने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) तीन बांगलादेशी आणि दोन भारतीय खेळाडूंना निलंबित केले आहे. बांगलादेशचे तौहीद हृदॉय, शमीम हुसेन, रकीबुल हसन यांची नावे आहेत, तर आकाश सिंग आणि रवी बिश्नोई यांनाही भारतीय संघाने शिक्षा सुनावली आहे.