जोहान्सबर्ग - ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा १०७ धावांनी दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १९७ धावांच्या आव्हानासमोर आफ्रिकेचा संघ ८९ धावांवरच गारद झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अॅश्टन अगरने गोलंदाजीत हॅट्ट्रीक नोंदवली.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात डावखुऱ्या गोलंदाजाने हॅट्ट्रीक करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. २६ वर्षीय अॅश्टनने आपल्या गोलंदाजीवर आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिस, अॅन्डिले फेल्लुक्वायो आणि डेल स्टेन यांना लागोपाठ बाद करत हॅट्ट्रीक नोंदवली. धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची स्थिती ४० धावांवर ४ बाद, अशी बिकट झाली होती. मात्र, त्यानंतर संघाच्या ४४ धावा झाल्या असताना अॅश्टनने पहिल्यांदा फाफ डू प्लेसिसला त्यानंतर अॅन्डिले फेल्लुक्वायो आणि डेल स्टेन यांना लागोपाठ बाद करत हॅट्ट्रीक केली. त्यामुळे आफ्रिकेची स्थिती ७ बाद ४४ अशी केविलवाणी झाली. त्यामुळे आफ्रिकेचा पराभव जवळपास तेथेचे निश्चित झाला.