सिडनी- भारताविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावणं, हा माझ्या प्रशिक्षकपदाच्या करिअरमधील सर्वात कठीण काळ होता, असे मत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी व्यक्त केले आहे. २०१८ साली लँगर यांची ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हा लँगरच्या मार्गदर्शनात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिलीच कसोटी मालिका भारताविरुद्ध खेळणार होता. या मालिकेआधीच ऑस्ट्रेलियाचे महत्वाचे दोन फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव स्मिथ यांना चेंडू छेडछाड प्रकरणात बंदीची शिक्षा झाली होती.
लँगर एका क्रीडा वाहिनीशी बोलाताना म्हणाले, 'मी जेव्हा दहा वर्षांनंतर आपल्या प्रशिक्षकपाच्या करिअरची समीक्षा करेन. त्यात माझा कठीण काळ म्हणून भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने मायदेशात गमावलेल्या मालिकेचा उल्लेख करेन. याशिवाय २००१च्या अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात माझा समावेश करण्यात आला नव्हता. याचाही उल्लेख मी माझ्या समीक्षेमध्ये करेन.
२००१मध्ये ३१ वर्षांचा असताना, मला ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवडण्यात आले नाही. यावेळी मला वाटलं की हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीचा अंत आहे. या कठीण काळातून तुम्ही काय शिकता हे गरजेचे ठरते. कठीण परिस्थितीमध्ये शिकण्यासारखे खूप काही आहे. यामुळे या परिस्थिला सामोरे जायला हवे, असेही लँगर म्हणाले.