मेलबर्न - आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या रिकी पाँटिंगने आता दारुचा व्यवसाय सुरु केला आहे. पाँटिंगने स्वतःच्या नावाची वाईन बाजारात आणली आहे. ट्विटरच्या माध्यमातून पाँटिंगने याबद्दल माहिती दिली.
प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन वाईन निर्माते बेन रिग्जसोबत पाँटिंग या क्षेत्रात काम करणार आहे. ''बेन रिग्जबरोबर काम करण्यासाठी तसेच आमचा नवीन व्यवसाय पाँटिंग वाईन सुरू करण्यासाठी रियाना आणि मी प्रचंड उत्सुक आहोत'', असे पाँटिंगने सांगितले.
दोन वेळा विश्वचषक जिंकणार्या क्रिकेटपटूने त्याच्या एका वाईनच्या प्रतिमेचे अनावरणही केले. विशेष म्हणजे, क्रिकेटपटूने त्याला ‘क्लोज ऑफ प्ले’ असे नाव दिले आहे. वाईनचे हे नाव पाँटिंगच्या आत्मचरित्राचे शीर्षक आहे.
पाँटिंगने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 168 कसोटी सामने खेळले असून त्याने 41 शतकांसह 13378 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 375 एकदिवसीय सामने खेळताना त्याने 30 शतकांसह 13704 धावा केल्या आहेत. पाँटिंगने 17 टी-20 सामने खेळले असून 2 अर्धशतकांसह 401 धावा केल्या आहेत.