सिडनी -ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा मुख्य फलंदाज स्टीव्ह स्मिथ कोरोनाव्हायरसमुळे मिळालेल्या विश्रांतीचा आनंद लुटत आहे. स्मिथने अलीकडेच त्याच्या मित्रांसमवेत वेळ घालवला आणि एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला.
स्मिथने बागेत बसलेल्या त्याच्या चार मित्रांसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. "काही चांगल्या लोकांसोबत छान वेळ घालवला आहे", असे त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले.
काही दिवसांपूर्वी, स्मिथने क्रिकेट प्रशिक्षणाला सुरूवात केली होती. त्याने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला होता. "नेट्समध्ये तीन महिन्यांत प्रथमच. चांगली बातमी. बॅट कशी धरायची ते आठवते", असे स्मिथने इंस्टाग्रामवर म्हटले होते. कोरोना व्हायरसमुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद आहे. मात्र कोरोनाचे संकट नसते तर, स्मिथने यावेळी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व केले असते.
यावर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. परंतु कोरोनामुळे या स्पर्धेवर टांगती तलवार आहे. या स्पर्धेशिवाय, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. येथे दोन्ही संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळतील.