मुंबई - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचक डीन जोन्स यांचे निधन झाले आहे. डीन यांना मुंबईमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यात त्यांचे निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. दरम्यान, त्यांच्या अकाली निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.
सध्या यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रिमियर लीगसाठी समालोचक म्हणून त्यांनी करार केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ते मुंबईत आले होते. मुंबईत त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यात त्यांचे निधन झाले.
डीन जोन्स यांचा जन्म मेलबर्न येथे झाला होता. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून ५२ कसोटी सामने खेळली आहेत. यात त्यांनी ४६.५५च्या सरासरीने ३ हजार ६३१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये २१६ ही त्यांची सर्वाधिक धावसंख्या आहेत. यात ११ शतकांचा समावेश आहे. जोन्स यांनी १६४ एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यात त्यांनी ४४.६१च्या सरासरीने सात शतकं आणि ४६ अर्धशतकांसह ६ हजार ६८ धावा केल्या आहेत.