लंडन - ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झम्पाची काही छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाले. या व्हिडिओचा आधार घेत नेटकऱ्यांकडून अॅडम झम्पावर बॉल टॅम्परिंगचा आरोप करण्यात येत होता. मात्र, सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने याबाबत स्पष्टीकरण देत झम्पावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
अॅडम झम्पा चेंडूशी छेडछाड नव्हे, तर हात गरम करत होता - अॅरोन फिंच - Australia
ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरोन फिंचने झम्पावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
फिंच म्हणाला की, 'अॅडमची छायाचित्रे मी पाहिली नाहीत, मात्र, तो चेंडूशी छेडछाड करण्याच्या हेतूने आपले हात खिशात घालत नव्हता, तर तो आपले हात गरम करण्यासाठी वारंवार हात खिशात घालायचा. झम्पा प्रत्येक सामन्यात आपले हात गरम करण्यासाठी खिशात हॅन्डवॉर्मर ठेवतो. त्यामुळेच तो खिशात हात घालत होता. यात विशेष असे काहीच नाही.'
वर्षाभरापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर १२ तर कॅमेरुन बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये एकच खळबळ उडाली होती.