नवी दिल्ली -आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारताच्या या दौऱ्याची क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने देखील या दौऱ्याबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. यात त्याने, उभय संघातील कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाचा दावेदार असल्याचे म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा सर्वश्रेष्ठ
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन टी-२०, तीन एकदिवसीस आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेविषयी अक्रमने आपले मत व्यक्त केले. एका यूट्यूब चॅनलशी बोलताना अक्रम म्हणाला, मला वाटत ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्यांच्याकडे पॅट कमिन्स, मिशेच स्टार्क, जोश हेजलवूड यासारखे अव्वल गोलंदाज आहेत. यामुळे उभय संघातील मालिका अटातटीची होईल. पण माझे मत आहे की, ऑस्ट्रेलियाचा संघ यात विजयाचा दावेदार आहे.