पर्थ - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात पर्थमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने मजबूत पकड निर्माण केली आहे. पहिल्या डावात ४१६ धावा केल्यानंतर, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर किवीचा पहिला डाव १६६ धावात ढेपाळला आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २५० धावांची मजबूत आघाडी मिळवली. दरम्यान, या सामन्यात स्टिव्ह स्मिथ आणि पाकिस्तानचे पंच अलिम दार यांच्यात एक वेगळाच सामना पाहायला मिळाला.
पर्थच्या मैदानात उभय संघात मालिकेतील पहिला सामना रंगला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्या संघाला बॅकफूटवर ढकलण्यात यजमान संघाला यश आले. या सामन्यात स्टिव्ह स्मिथ मस्तीच्या मूडमध्ये दिसला.
न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत असताना, स्टिव्ह स्मिथने पंच अलिम दार यांच्याशी मस्ती केली. त्याने क्षेत्ररक्षणादरम्यान, हेल्मेट परिधान केले आणि टोपी पंच अलिम दार यांच्याकडे हवेत भिरकावली. ती टोपी अलिम दार यांनी चपळता दाखवत हवेत झेलली. याचा एक व्हिडिओ ऑस्ट्रेलिया क्रिकेटने शेअर केला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅबुशेनच्या १४३ धावांच्या जोरावर ४१६ धावा केल्या. तर प्रत्त्युत्तरादाखल किवीचा संघ १६६ धावा करु शकला. मिचेल स्टार्कने १८ षटकात ५२ धावा देत ५ गडी बाद केले. त्याला फिरकीपटू नॅथन लिऑनने २ गडी बाद करुन चांगली साथ दिली. हेटलवूडने एक गडी टिपला.
हेही वाचा -VIDEO : हवेत 'सूर' मारुन स्मिथने घेतला अप्रतिम झेल, फलंदाज चक्रावला
हेही वाचा -AUSvNZ : पर्थ कसोटीत टीम साऊथीचे आक्रमक रूप, जो बर्न्सला फेकून मारला चेंडू