पर्थ - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून मालिकेचा पहिला सामना पर्थच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि जो बर्न्स यांनी डावाला सुरुवात केली. तेव्हा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने फलंदाज बर्न्सच्या दिशेने चेंडू फेकून मारला. 'ऑस्ट्रेलिया क्रिकेट'ने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या सातव्या षटकात साऊथीच्या चेंडूवर फलंदाज बर्न्स हा स्ट्रेट ड्राईव्ह मारू पाहत होता. त्याने स्टेट ड्राईव्हसाठी फटका लगावला. मात्र, तो चेंडू साऊथीने पकडला आणि बर्न्सला काही कळण्याआधीच त्याच्याकडे फेकून मारला. साऊथीने बर्न्सला धावबाद करण्याच्या हेतूने चेंडू फेकला, पण फलंदाज स्टंपच्या समोर उभा असल्याने चेंडू त्याला लागला.