मेलबर्न -ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या अंतिम संघाची घोषणा केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत लँगर यांनी, विजयी संघ कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
आयोजित पत्रकार परिषदेत लँगर म्हणाले की, मी विजयी संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा विचार करू शकत नाही. जोपर्यंत याची गरज भासत नाही. तोपर्यंत आम्ही हा संघ कायम ठेऊ.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची क्षमता वाढवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामना पाहण्यासाठी प्रति दिवशी ३० हजार प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. पूर्वी ही परवानगी २५ हजार प्रेक्षकांची होती.
असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ
- जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशेन, स्टिव्ह स्मिथ, ट्रैविस हेड, कॅमरून ग्रीन, टीम पेन (यष्टीरक्षक आणि कर्णधार), पॅट कमिंन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियोन आणि जोश हेजलवुड.
टीम इंडिया कसोटी मालिकेत पिछाडीवर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना (दिवस रात्र) अॅडलेडच्या मैदानात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. हा सामना ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
पहिल्या सामन्यात फलंदाजांची हाराकिरी -
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाला कशीबशी २४४ धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १९१ धावा करू शकला. पहिल्या डावात भारतीय संघाने आघाडी मिळवली. पण दुसऱ्या डावात भारतीय धुरंदर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर ढेर झाले. भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाने ९० धावांचे आव्हान २ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.
हेही वाचा -Ind Vs Aus: बॉक्सिंग डे कसोटीत 'या' पाच रेकॉर्डवर नजर; पुजारा आणि लियोन यांना इतिहास रचण्याची संधी
हेही वाचा -Aus vs Ind: टीम इंडिया कसोटी मालिकेत उलटफेर करू शकते; ऑस्ट्रेलियाच्या माजी प्रशिक्षकांनी सांगितलं कारण