पर्थ- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात पर्थ येथे प्रकाशझोतात खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना यजमान ऑस्ट्रेलिया संघाने २९६ धावांनी जिंकला. मिचेल स्टार्कने या सामन्यात भेदक गोलंदाजी केली. त्याचा गोलंदाजीसमोर किवीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आणि यजमान संघाने चौथ्या दिवशीच विजय साजरा केला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना, मार्नस लबूशेनचे शतक (१४३) आणि ट्रेविस हेडचे (५६) अर्धशतक याच्या जोरावर पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टिम साऊथी आणि नील वेग्नर यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात २१७ धावा करु शकला. रॉस टेलरने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली. मात्र, तो वगळता इतर फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचा सामना करण्यात अपयशी ठरले. मिचेल स्टार्कने ५ गडी बाद करत किवींचे कंबरडे मोडले.
ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव २१७ धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात जो बर्न्स (५३) आणि मार्नस लबूशेनने (५०) अर्धशतकी खेळी केली आणि न्यूझीलंडला ४६८ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य दिले.